पोलीस दलात सामील होऊन रुबाबदार करिअर करण्याचे अनेक युवक-युवतींचे स्वप्न असते. त्यासाठी कित्येक दिवसांपासून ते मैदानावर तयारी करताना दिसतात. जिममध्ये घाम गाळून सर्व दृष्टीने फिजिकली फिट राहण्यासाठी फुल्ल तयारी करून पोलीस भरतीची जाहिरात केव्हा येते, याकडे त्यांचे लक्ष असते. आता मात्र या स्वप्नाकडे जाण्याचा युवक-युवतींचा मार्ग मोकळा झाला आहे. महाराष्ट्र पोलीस दलात मोठ्या प्रमाणात भरती करण्यात येत आहे. राज्यात १९ जूनपासून पोलीस भरती प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. या भरतीमध्ये महाराष्ट्र पोलीस दलातील १७ हजार ४७१ जागांसाठी, कारागृहातील पदांसाठी १,८०० जागा, तर बँड्समन पदासाठी ४१ जागांवर भरती होत आहे. त्याचप्रमाणे वाहनचालक पदासाठी १६८९ जागा, पोलीस शिपाई ९५९५ जागा आणि कारागृह विभागातील शिपाई पदासाठी भरती सुरु आहे.
पोलीस भरती १९ जूनपासून पोलीस दलाच्या कवायत मैदानावर सुरु झाली आहे. या भरतीमध्ये पहिल्या दिवशी ५०० तर दुसऱ्या दिवसापासून एक हजार उमेदवारांची शारीरिक आणि मैदानी चाचणी सुरु झाली आहे. या भरतीमध्ये अचूकता राखण्यासाठी आणि त्रुटी टाळण्यासाठी पोलीस दल कटिबद्ध आहे. भरतीमध्ये प्रथम शारीरिक मोजमाप घेतले जाईल व त्यातून परीक्षेसाठी पात्र उमेदवार निवडले जातील. पोलीस भरतीत अर्ज भरण्यापासूनची संपूर्ण प्रक्रिया ही ऑनलाईन असून, परीक्षेसंबंधीचे वेळापत्रक, हॉलतिकीट आणि इतर सर्व माहिती ही उमेदवाराने दिलेल्या मोबाईल नंबरवर पाठवली जात आहे.
* पोलीस भरती प्रक्रिया :-
* १९ जूनला पहाटे साडे चार वाजता पहिली एंट्री
* प्रवेशानंतर हॉल तिकीट तपासणी
* शारीरिक उंची व छातीची मोजणी
* शारीरिक पात्रता चाचणी
* ध्यावण्याची स्पर्धा
* गोळाफेक
या सर्व चाचण्या पार पडल्यानंतर मैदानी चाचणी होणाऱ्या प्रत्येक उमेदवाराची दररोज गुणांची यादी लावली जाईल. प्राप्त गुणांसह इतर तक्रारी आणि समस्यांसाठी प्रथम अपिलीय अधिकारी म्हणून DYSP आणि दुय्यम पोलीस अधीक्षक हे मैदानावर उमेदवारांचे अपील ऐकण्यासाठी आणि समस्या सोडविण्यासाठी उपस्थित राहतील. पुरुष उमेदवारांची शारीरिक चाचणी आणि इतर मैदानी चाचण्या पार पडल्यानंतर महिला उमेदवारांची चाचणी घेण्यात येईल. पोलीस भरती प्रक्रिया ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठ्वड्यापर्यंत पूर्ण करण्यात येणार असून, या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांचे प्रशिक्षण ऑक्टोबर महिन्याच्या अखेर सुरू होण्याची शक्यता आहे. तुम्हीही महाराष्ट्र पोलीस दलात सामील होऊ इच्छित असाल तर या संधीचा अवश्य फायदा घ्या.
पोलीस भरती प्रक्रियेत यशस्वी होण्यासाठी सर्वांना हार्दिक शुभेच्छा ! जय हिंद !