Entrance exam for 11th std Boys & Girls has been scheduled on 5th May 2024

blog Images

भारतीय संरक्षण सेवेत महिला शक्तीची उंच भरारी !

13 October 2023

भारतीय महिला, नारीशक्ती आज प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर आहे. कुटुंबाचे कुशल व्यवस्थापन करणाऱ्या महिलांनी आपल्या कौशल्याच्या आणि कार्याच्या बळावर मोठमोठ्या उद्योगांचे व्यवस्थापनही अगदी उत्तमरीत्या सांभाळले असल्याची अनेक उदाहरणे समाजात दिसतात. आजच्या काळात असे एकही क्षेत्र आढळणार नाही, जिथे महिलांनी आपले कार्यकर्तृत्व गाजवलेले नाही. सर्वाधिक कठीण आणि कठोर परिश्रमाचे क्षेत्र असलेल्या भारतीय सेनेतही महिलांनी बाजी मारली आहे. देशाच्या सशस्त्र दलात सर्वात प्रतिष्ठित पदांवर उत्कृष्ट भूमिका पार पाडण्याचे काम महिलांनी केले आहे. सिंहासारखी हिंमत बाळगणाऱ्या महिलांनी भारतीय सेनेत सर्वोच्च स्थान मिळवले आहे. अशाच काही जिगरबाज आणि लढाऊ महिलांची आज ओळख करून घेऊयात.

* मेजर दिव्या अजित कुमार --- मेजर दिव्या अजित कुमार यांची कामगिरी जादुई आहे. त्यांच्या कुटुंबाला कुठलीही लष्करी पार्श्वभूमी नाही. चेन्नईमधील तामिळ कुटुंबात जन्म घेणाऱ्या मेजर दिव्या अजित कुमार यांनी मिळवलेले यश कौतुकास्पद आहे. भारतीय सैन्यात प्रतिष्ठित समाजाला जाणारा Sword of Honor (स्वार्ड ऑफ ऑनर) पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. अशी कामगिरी करणाऱ्या त्या पहिल्या महिला कॅडेट आहेत. 2015 मध्ये झालेल्या प्रजासत्ताक दिन सोहळ्यात प्रमुख पाहुणे अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष बराक ओबामा यांच्या उपस्थितीत झालेल्या मुख्य परेडमध्ये मेजर दिव्या यांनी 154 महिला अधिकारी आणि कॅडेट्सच्या पहिल्या महिला तुकडीचे नेतृत्व केले. मेजर दिव्या कला क्षेत्रातही अग्रेसर आहेत. त्यांनी भरतनाट्यम, बास्केटबॉल, डिस्क थ्रो अशा क्रीडा आणि कलांमध्येही प्रभुत्व मिळवले आहे. मेजर दिव्या सध्या ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमीशी संलग्न आहेत.

* कॅप्टन प्रिया सेमवाल --- भारतीय सैन्यात जवान म्हणून सेवा करणारे पती नाईक अमित शर्मा यांच्याशी विवाह झाल्यानंतर कॅप्टन प्रिया सेमवाल यांना आपण भारतीय सैन्यात करिअर घडवू, याची कल्पनाही नव्हती. पण पतीच्या पाठिंब्याने त्यांनी पदवीचे शिक्षण पूर्ण केले आणि गणितात M. Sc. केले, तसेच B. Ed. पदवीही मिळवली. त्यांची नोकरी करण्याची इच्छा होती. पण त्यांच्या नशिबी आणखी वेगळे काहीतरी होते. अरुणाचल प्रदेशातील एका चकमकीत त्यांच्या पतीला वीरमरण आले. त्या काळात प्रिया स्वतः निराश अवस्थेत होत्या, परंतु कर्नल अरुण अग्रवाल यांनी त्यांना भारतीय सैन्यात नोकरी करण्याचा सल्ला दिला. प्रिया यांना सुरुवातीला संकोच वाटला, पण त्यांनी आपल्या मुलीच्या भविष्यासाठी कठोर प्रयत्न करून CDS आणि SSB परीक्षा उत्तीर्ण होऊन भारतीय सैन्यात कमिशन्ड ऑफिसर हे पद प्राप्त केले.

* सबलेफ्टनंट शिवांगी सिंग --- एक मोठी राजकीय व्यक्ती त्यांच्या हेलिकॉप्टरमधून गावाची पाहणी करीत असल्याचे दृश्य एका लहान मुलीच्या मनात घर करून बसले आणि आपणही पायलट व्हावे, असा तिने मनाशी निर्धार केला. पायलट होण्याच्या या आवडीमुळे शिवांगी यांनी मेकॅनिकल इंजिनीअरिंगमध्ये बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी पदवी मिळवण्यासाठी खूप अभ्यास केला. त्यानंतर पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेतले. त्यानंतर विविध अभ्यासक्रम यशस्वीरीत्या पूर्ण केले. SSC-पायलट एंट्री योजनेद्वारे त्यांनी भारतीय नौदलात प्रवेश केला. केवळ 24 वर्षांची ही तरुणी शिवांगी सिंग 2 डिसेंबर 2019 रोजी भारतीय नौदलाची पहिली महिला पायलट बनली.

* फ्लाईट लेफ्टनंट अवनी चतुर्वेदी --- अवनी चतुर्वेदी पहिल्या तीन फायटर पायलट फ्लाइट लेफ्टनंटपैकी एक आहेत. मध्य प्रदेशातील जलसंपदा विभागातील अधीक्षक अभियंता दिनकर चतुर्वेदी हे त्यांचे पिता. अवनी यांना आपल्या भावाकडून सशस्त्र सैन्य दलात अधिकारी होण्याची प्रेरणा मिळाली. याशिवाय कॉलेजच्या फ्लाइंग क्लबमधील त्यांच्या उड्डाणाच्या अनुभवामुळे त्यांना भारतीय वायुसेनेमध्ये सामील होण्यास प्रवृत्त केले.

* फ्लाईट लेफ्टनंट मोहनासिंग जितरवाल --- अवनी चतुर्वेदी यांच्यासोबत मोहनासिंग या पहिल्या लढाऊ वैमानिकांपैकी एक आहेत. जून 2016 मध्ये त्यांनी भारतीय हवाई दलात प्रवेश घेतला. भारतीय वायुसेनेचे कर्मचारी प्रतापसिंग हे त्यांचे पिता. मोहना सिंग यांचे शालेय शिक्षण एअरफोर्स स्कूलमध्ये झाले. त्या आजघडीला पहिल्या तीन लढाऊ वैमानिकांपैकी एक आहेत. या सर्वच शूरवीर, धाडसी महिलांचा प्रवास आपल्यासाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल.