अदम्य साहस आणि प्रचंड धाडसाच्या बळावर वीर भारतीय जवानांनी अनेकदा शत्रुसैन्याला धूळ चारली आहे. जगभरातील सेना दलांच्या यादीत त्यामुळेच भारतीय लष्करी जवानांनी आपल्या पराक्रमाने वेगळी ओळख निर्माण केली आहे. भारतीय सैन्याच्या पराक्रमाची शौर्यगाथा सांगणारा दिवस म्हणजे कारगिल विजय दिन. दि. २६ जुलै १९९९ च्या कारगिल युद्धात मोठा पराक्रम गाजवून भारताने पाकिस्तानवर विजय मिळविला. हाच तो ऐतिहासिक दिवस. कारगिल युद्धात शहीद झालेल्या सर्व वीर जवानांना हा दिवस समर्पित असून, भारतीय जवानांच्या पराक्रमाचे आणि बलिदानाचे स्मरण करून देण्यासाठी दरवर्षी २६ जुलैला साजरा करण्यात येतो. महाराष्ट्रातील नामांकित सैनिकी प्रशिक्षण संस्था डिफेन्स करिअर अकॅडमीमध्येही शिस्त आणि देशभक्तीच्या वातावरणात विद्यार्थी आणि शिक्षकांनी कारगिल विजय दिन साजरा केला. यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रत्यक्ष कारगिल युद्धात सहभागी झालेल्या आणि सध्या संस्थेत विविध पदांवर कार्यरत असलेल्या माजी सैनिकांना पुष्पगुच्छ देऊन, त्यांच्या धाडसी कार्याप्रती गौरव करण्यात आला.
भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये आतापर्यंत ३ वेळा युद्ध झाले आहे, परंतु कारगिलचे युद्ध हे भारत-पाकिस्तान युद्धाच्या इतिहासातील सर्वात भयंकर आणि दीर्घकाळ चालणारे युद्ध होते. जाणून घेऊया काय आहे कारगिल विजय दिनाचा इतिहास.
* १९९० च्या दशकात काश्मीरमधील फुटीरतावादी कारवायांमुळे वाढलेला तणाव आणि संघर्ष यातून १९९८ मध्ये दोन्ही देशांनी केलेल्या अणुचाचण्यांमुळे वाढत्या तणावाचे गंभीर वातावरण निर्माण झाले होते.
* अशा परिस्थितीत भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांनी फेब्रुवारी १९९९ मध्ये लाहोर जाहीरनाम्यावर स्वाक्षऱ्या केल्या.
* धगधगत्या काश्मीर संघर्षावर शांततापूर्ण आणि द्विपक्षीय तोडगा काढण्याचे ठरले.
* १९९८ ते १९९९ यादरम्यानच्या हिवाळ्यात पाकिस्तानी सशस्त्र दलातील काही घटक गुप्तपणे प्रशिक्षण देत होते.
* तसेच पाकिस्तानी सैन्य आणि दलांना LOC च्या भारताच्या आसपासच्या प्रदेशात पाठवत होते.
* या घुसखोरीला 'ऑपरेशन बद्री' असे नाव देण्यात आले होते.
* काश्मीर आणि लडाख या भूभागादरम्यान असलेला दुवा तोडणे आणि भारतीय सैन्याने सियाचीन ग्लेसियरमधून माघार घेणे या उद्देशाने पाकिस्तान घुसखोरी करत होता.
* पाकिस्तानी घुसखोरांनी नियंत्रण रेषा (LOC) ओलांडून हल्ला सुरू केला.
* कारगिल युद्धात पाकिस्तानचा पराभव करण्यासाठी भारताने 'ऑपरेशन विजय' सुरू केले.
* हे युद्ध सुमारे ६० दिवसांपेक्षा अधिक काळ सुरू होते.
* भारतीय सैन्याने अदम्य साहस आणि प्रचंड धाडस दाखवत या युद्धात पाकिस्तानचा पराभव केला.
* युद्धासाठी इस्राईलने भारताला ड्रोन आणि इतर लष्करी साहित्य पुरवून मोठी मदत केली होती.
* या युद्धात भारतीय सेनेतील ५०० पेक्षा अधिक पराक्रमी सैनिकांना वीरमरण प्राप्त झाले. एक हजारापेक्षा अधिक सैनिक या युद्धात जखमी झाले.
* कारगिल युद्धात शहीद झालेल्या सैनिकांपैकी 4 जणांना परमवीर चक्र, 10 जणांना महावीर चक्र आणि 70 जणांना वीरचक्र प्रदान करण्यात आले.
* कारगिलच्या या भयंकर युद्धात कॅप्टन विक्रम बत्रा यांनी 5 शत्रूंना ठार केले होते.
* स्वतःला गंभीर दुखापत होऊनही कॅप्टन विक्रम बत्रा यांनी भारतीय सैन्याचे नेतृत्व केले.
* बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग नसताना त्यांनी गोळीबार करत समोरून शत्रूंवर हल्ला केला.
* शत्रूंचा सामना करताना कॅप्टन विक्रम बत्रा यांनी देशासाठी बलिदान दिले.