छत्रपती संभाजीनगर, दि. २० : भारतीय संरक्षण मंत्रालय व सैनिकी स्कूल सोसायटीद्वारे मान्यताप्राप्त केंद्रीय सैनिकी स्कूल असलेल्या महाराष्ट्रातील नामांकित सैनिकी प्रशिक्षण संस्था डिफेन्स करिअर अकॅडमीमध्ये शिक्षण घेणाऱ्या कॅडेट्ससाठी गुरुवारी, २० नोव्हेंबरला ड्रोन असेंब्ली आणि पायलट प्रशिक्षणाचा महत्त्वाकांक्षी उपक्रम घेण्यात आला. या प्रशिक्षणात विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष युद्धादरम्यान ड्रोनचा वापर कशा पद्धतीने केला जातो, याचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. यावेळी गर्ल्स विंगच्या विद्यार्थिनींनीही प्रत्यक्ष ड्रोन उडविण्याचा आनंद घेतला.
डिफेन्स करिअर अकॅडमीचे संचालक व डिफेन्स करिअर कोच श्री. केदार रहाणे यांच्या पुढाकारातून घेण्यात आलेल्या या प्रशिक्षणात फेडरेशन ऑफ इंजिनियर्स असोसिएशनचे तज्ज्ञ प्रशिक्षक श्री. प्रशांत महाजन यांनी विद्यार्थ्यांना ड्रोन तंत्रज्ञानाविषयी सखोल मार्गदर्शन केले. या प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांना केवळ ड्रोनचे भाग जुळवण्याचे ज्ञानच मिळाले नाही, तर त्यांना ड्रोन उडवण्याचे तंत्र आणि त्यावर नियंत्रण कसे मिळवायचे, याचाही प्रत्यक्ष अनुभवही घेता आला.
डिफेन्स करिअर अकॅडमीचे सीईओ श्री. उद्धव टकले यांच्या मार्गदर्शनाखाली आयटी विभागाच्या समन्वयातून आयोजित केलेल्या या प्रशिक्षणावेळी प्राचार्य श्री. श्रीकांत वरुडे, उपप्राचार्य श्री. बालकृष्णन, श्री. शशिकांत बडाख यांच्यासह संस्थेतील शिक्षक व प्रशिक्षकही आवर्जून उपस्थित होते.